मुंबई : पारनेर अपडेट मिडिया
दरवेळी आपण पावसाळ्यामध्ये इतक्या क्युसेक पाण्याचा विसर्ग किंवा इतक्या इतक्या टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला हे शब्द ऐकतो. पण त्यांचा नेमका अर्थ काय?
राज्यात अतिवृष्टीने गुरुवारी (२२ जुलै २०२१ रोजी) हाहाकार माजवला. चिपळूण, महाडला पुराने वेढले असून, त्यात शेकडो नागरिक अडकले आहेत. उल्हास नदीच्या पुरामुळे बदलापूरसह कल्याण तालुक्यातील अनेक गावे जलमय झाली. कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली. विदर्भातही अतिवृष्टीने दाणादाण उडवली. दुसरीकडे खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस कायम आहे. त्यामुळे खडकवासला धरण गुरुवारी दुपारी १०० टक्के भरले. परिणामी या धरणातून मुठा नदीपात्रात १० हजार ९६ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.
खडकवासलाच नाही तर इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्येही समाधानकारक पाऊस झाल्याने धरणं भरु लागली आहेत. मात्र ती क्षमतेपेक्षा अधिक भरल्यानंतर त्यामधील पाणी सोडून देण्यात येतं. अनेकदा आपण बातम्यांमध्ये वाचतो त्याप्रमाणे अमुक एका धरणातून इतकं क्युसेक पाणी सोडलं, इतक्या टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला असा उल्लेख दिसतो. मात्र धरणातून अमूक क्युसेक पाणी सोडलं म्हणजे नक्की किती? एक टीएमसी म्हणजे नक्की किती लीटर पाणी हे अनेकांना ठाऊक नसतं. त्याच पार्श्वभूमीवर धरणातील पाणी पातळी कशी मोजली जाते आणि त्याचा विसर्ग करताना वापरल्या जाणार्या एककांचा समान्य भाषेतील अर्थ काय यावर टाकलेली नजर
पाणी हे प्रामुख्याने दोन पद्धतीने मोजलं जातं. पहिला प्रकार म्हणजे वॉटर अॅट रेस्ट म्हणजेच पाणीसाठा आणि दुसरा प्रकार वॉटर इन मोशन म्हणजेच वाहणारं पाणी. यापैकी पाणीसाठा हा जलस्त्रोतांसंदर्भात वापरलं जातं. ज्यामध्ये पाणी तलाव, विहरी, बोरवेलसारख्या गोष्टींचा समावेश होतो. तर दुसरा प्रकार म्हणजे नद्यांना असणारं पाणी. सामान्यपणे जलसाठ्यांमधील पाणी मोजण्यासाठी घनफूट (क्युबिक फूट) हे एकक वापरलं जातं. मात्र मोठ्या प्रमाणातील जलसाठा असेल तर तो मोजण्यासाठी वेगळी एककं वापरली जातात. नद्यांमधून वाहणारे पाणी आणि धरणामधील पाणीसाठी मोजण्यासाठी टीएमसी फूट हे एकक वापरलं जातं.
टीएमसी म्हणजे नक्की किती?
एक टीएमसी फूट म्हणजे १०० कोटी घनफूट (क्युबिक फूट). इंग्रजीमधील संख्याशास्त्राप्रमाणे मिलियन हा शब्द वापरतात. त्यामुळेच जास्त प्रमाणात पाणी असेल तर त्याला वन थाऊजंड मिलियन क्युबिक फूट असं म्हणतात. यावरुन टीएमसी (Thousand Million Cubic) हे एकक जन्माला आलं. लिटर्समध्ये सांगायचं झालं तर एक टीएमसी फूट म्हणजे २.८३१ x१०,०००,०००,००० लीटर पाणी. सोप्या भाषेत सांगायचं तर २८० हजार कोटी लिटरहून अधिक. उदाहरण द्यायचं झालं तर पुण्यातील खडकवासला धरणाची क्षमता १.९७ टीएमसी एवढी आहे म्हणजे या धरणामध्ये १.९७ गुणीले २.८३१ x १०,०००,०००,००० इतकं पाणी साठवू शकतो. एक घनफूट (क्युबिक फूट) पाणी म्हणजे २८.३३ लिटर होय.
क्युसेक म्हणजे काय?
क्युसेकबद्दल बोलायचं झाल्यास हे पाण्याचा प्रवाह किती आहे हे मोजण्याचं एकक आहे. ‘क्युसेक्स’ म्हणजे ‘घनफूट प्रतिसेकंद’ तर ‘क्युमेक्स’ म्हणजे ‘घनमीटर प्रतिसेकंद’. एखाद्या धरणातून किंवा बंधाऱ्यावरुन एका सेकंदाला किती घनफूट (क्युबिक फूट) किंवा घनमीटर पाणी वाहतं हे या एककाच्या मदतीने समजतं. म्हणजेच वर उल्लेख केला त्याप्रमाणे खडकवासला धरणातून गुरुवारी दुपारी १० हजार ९६ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला या वाक्याचा सोप्या शब्दात अर्थ सांगायचा झाल्यास गुरुवारी दुपारपासून खडकवासला धरणामधून प्रती सेकंदाला १० हजार ९३ घनफूट (क्युबिक फूट) वेगाने पाणी सोडण्यात आलं. म्हणजेच १० हजार क्युसेक्स वेगाने १ टीएमसी पाणी सोडलं असं म्हटल्यास. एका सेकंदाला १० हजार घनफूट पाणी या हिशोबाने १०० कोटी घनफूट पाणी सोडलं.
महाराष्ट्रातील काही मोठी धरणे
उजनी ११७.२७ टीएमसी
कोयना १०५.२७ टीएमसी
जायकवाडी ७६.६५ टीएमसी (पैठण)
पैंच तोतलाडोह ३५.९० टीएमसी
पूर्ण येलदरी २८.५६ टीएमसी