पारनेर मध्ये रंगली काव्य मैफल.
पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
पायामंदी सलतो गं। सखे बोराटीचा काटा।
तुझ्या पायातली सल। त्यात महा निमा वाटा।
पाय नाजूक साजूक। राणी कापसावाणी।
तुह्या पायाला भुलली। बघ काट्याची आणी।
अशी तरल प्रेम भावना व्यक्त करणारी कविता गाऊन सादर करीत युवा कवी नारायण पुरी सह महाराष्ट्रातील नामांकित कवींनी आपल्या काव्यरचना सादर करून पारनेरकर काव्य रसिकांना भर दुपारी भुरळ घातली.
महाराष्ट्र साहित्य परिषद पारनेर शाखा व मातोश्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. २८ नोव्हेंबर रोजी पारनेर येथील आनंद लॉन्स येथे दिनेश औटी यांच्या पुढाकारातून या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. अशोक बागवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कवी संमेलनात जेष्ठ कवी साहेबराव ठाणगे, सतीश सोळंकुरकर, अरुण पवार, भरत दौंडकर, नारायण पूरी, राजेंद्र वाघ यांनी आपल्या विविध विषयांवरील कविता सादर केल्या.
प्रा. अशोक बागवे यांच्या कवी जेव्हा बोलतो प्राणातून। तेव्हा त्याला हसायचं नसतं। या कवितेने कवी संमेलनास प्रारंभ झाला. त्यानंतर परळीहून आलेले पहाडी आवाजाचे कवी अरुण पवार यांनी वाहिले राहिले मुलं। अन दोघांची वाटणी माय परसात। बाप गोठ्याचा धनी। ही वाटणीची कविता सादर केली. या कवितेने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. टाळ्यांच्या कडकडाटात या कवितेला श्रोत्यांनी उस्फूर्तपणे दाद दिली. त्यानंतर या जिल्ह्याच्या पल्याड। मव्हं लेकरू शिकाले। किती थकले भागले। परि कामाला लागले। ही आपल्या परगावी शिकणाऱ्या मुलाबद्दल काळजी करणाऱ्या आईची व्यथा, वेदना मांडणारी कविता सादर केली.
भरत दौंडकर यांनी कला केंद्रातील नृत्य गायन करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या नृत्यांगणेची व्यथा सांगणारी ‘घुंगरू’ ही कविता सादर केली. आपल्या कवितेत ते म्हणतात कसं सांगावं साहेब तुम्हाला। हा देह आहे, कलाकेंद्र नाही। जन्माच्या घरात जसा जगण्याचा किराणा भरावाच लागतो। तसं गाणं सुरात असो की बेसूर, ताल हा धरावाच लागतो।
राजेंद्र वाघ यांनी हिरव्या आंब्याच्या डहाळी। मांडवात सजनार। सूर सनईचे दारी आनंदात वाजणार। शुभ सोहळा माझ्या दारात होणार। माझी लाडकी छकुली। तिच्या सासरी जाणार। असे वर्णन असणारी कन्यादान ही कविता सादर केली.
जेष्ठ कवी साहेबराव ठाणगे यांनी माझा गाव माझ्या डोळ्यात घर करून राहिला। गावात मातीचेच रस्ते होते। पण पाणी मात्र सस्ते होते। हरवला माझा गवताचा गाव। साध्या भोळ्या माणसाचा चुकला ठाव। ही जुन्या गावचे गावपण वर्णन करणारी कविता सादर केली.
जेष्ठ कवी सतिश सोळंकुरकर यांनी एक आई सोडली तर तसे आमच्याकडे वडिलोपार्जित असे काही नाही ही आईची व्यथा मांडणारी कविता सादर केली. नारायण पूरी यांनी त्यांची तुफान गाजलेली प्रेमाचा जांगडगुत्ता गं जीव झाला हा खलबत्ता गं. उखळात खुपसले तोंड प्रिये, मुसळाचा तुंबळ रट्टा गं. ही कविता सादर केली.
प्रा. अशोक बागवे यांच्या कवितेने या कवी संमेलनाचा समारोप झाला.पद्मश्री पोपटराव पवार यांच्याहस्ते संत तुकाराम गाथा भेट देऊन उपस्थित कवींचा सत्कार करण्यात आला. भरत दौंडकर यांनी या कवी संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन केले. या कवी संमेलनास संत तुकाराम महाराज साहित्य पुरस्कार प्राप्त साहित्यिक डॉ. संजय कळमकर, महाराष्ट्र साहित्य परिषद पारनेर शाखेचे अध्यक्ष दिनेश औटी, पारनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वाघमारे, वस्तू व सेवा कर उपायुक्त डॉ. गणेश पोटे, उद्योजक सुरेश पठारे, शिक्षक नेते रा. या. औटी, वाहन निरीक्षक पद्माकर भालेकर, संभाजी औटी, नगरसेवक साहेबराव देशमाने, नंदकुमार देशमुख, दिलीप भालेकर, कैलास गाडीलकर, बापूसाहेब भूमकर, पुरुषोत्तम सदाफुले, दिगंबर ढोकले यांच्यासह काव्यरसिक उपस्थित होते.