पद्मश्री पोपटराव पवार : पारनेर येथे संत तुकाराम महाराज पुरस्कार वितरण
पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
जागतिक महामारीमुळे २०२० हे वर्ष चालू शतकातील सर्वात वाईट वर्ष मानले जाते.असे असले तरी पर्यावरण संवर्धन व मानवजातीच्या कल्याणासाठी चालू वर्ष हे सर्वात चांगले वर्ष आहे. टाळेबंदीमुळे मोठ्या प्रमाणावर पर्यावरण संवर्धन झाले.वातावरणातील ओझोनच्या थराला पडलेले मोठे भगदाड अब्जावधी रुपये खर्च करूनही बुजवण्यात यश येत नव्हते. मात्र टाळेबंदीच्या काळात पर्यावरण संवर्धन मोठ्या प्रमाणावर झाल्याने ओझोन वायूच्या थराला पडलेले भगदाड सांधले गेले. मानवजातीच्या कल्याणासाठी ही बाब उपकारक आहे. यापुढे संपूर्ण जगाने प्रत्येक वर्षी एक महिना संपूर्ण टाळेबंदी केली पाहिजे.अकरा महिने आपल्यासाठी व एक महिना पर्यावरणासाठी ही मोहीम हाती घेतली पाहिजे असे मत पद्मश्री पोपटराव पवार यांनी पारनेर येथे बोलताना व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेची पारनेर शाखा व मातोश्री प्रतिष्ठाणच्या संयुक्त विद्यमाने साहित्यिक डॉ.संजय कळमकर यांना श्रीसंत तुकाराम महाराज पुरस्काराने पद्मश्री पवार यांच्या हस्ते गौरवण्यात आले.यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी समर्थ शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष कैलास गाडीलकर व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अध्यक्ष बापूसाहेब भूमकर यांचा शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी स्वागताध्यक्ष, आमदार नीलेश लंके, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, मुंबई सहकारी बँकेचे माजी सरव्यवस्थापक,कवी साहेबराव ठाणगे, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पारनेर शाखेचे अध्यक्ष दिनेश औटी, पारनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे,वस्तू व सेवाकर उपायुक्त डॉ.गणेश पोटे,उद्योजक सुरेश पठारे, नेते रा.या.औटी,वाहन निरीक्षक पद्माकर भालेकर, संभाजी औटी नगरसेवक साहेबराव देशमाने, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे,विलास सोबले, दिलीप भालेकर वकील गणेश कावरे आदी उपस्थित होते.
संताचे विचार देशालाच नव्हे तर जगाला पर्यावरणाच्या -हासामुळे होणार्या धोक्यापासून वाचवू शकतात.संत साहित्यातील पर्यावरणविषयक विचार साहित्यीकांनी समाजापर्यंत पोहचवावेत असे आवाहन करून पवार पुढे म्हणाले, संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर,संत गाडगेबाबा,संत तुकडोजी महाराज यांच्या साहित्यामध्ये पर्यावरणविषयक जागृती बरोबरच ग्रामीण विकासाच्या विविध पैलूंवर अधिकारवाणीने भाष्य केलेले आहे.संताच्या साहित्यामध्ये, विचारांमध्ये पर्यावरण संवर्धन,जलसंधारण,ग्रामस्वछता याबाबत सखोल मार्गदर्शन केले आहे.संताचे विचार, मार्गदर्शन अमलात आणले तर खेड्यांचा मोठ्या प्रमाणावर विकास होऊ शकतो हे राळेगणसिद्धी, हिवरेबाजार या गावांमध्ये झालेल्या ग्रामविकासावरून सिध्द होत असल्याचे पवार म्हणाले.
संत साहित्यात जीवनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्याबरोबरच ग्रामविकासाबाबत सखोल मार्गदर्शन केले आहे.संताचे विचार साहित्यीकांनी समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत असे आवाहन पवार यांनी केले.
साहित्यिक संजय कळमकर यांनी सत्काराला उत्तर देताना आपली परखड मते मांडली. समर्थ शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष कैलास गाडीलकर, बापूसाहेब भूमकर आदींची भाषणे झाली.मातोश्री प्रतिष्ठाणचे अध्यक्ष दिनेश औटी यांनी प्रास्ताविक तर दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले.संजय वाघमारे यांनी आभार मानले.