आमदार लंके यांची ग्वाही ः देवस्थान रस्त्याचे भुमिपुजन
पारनेर ः राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जातेगाव येथील निसर्गसंपन्न श्री भैरवनाथ देवस्थान परिसरास पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या तिर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत देवस्थानाला जोडणा-या रस्त्याचे आमदार लंके यांच्या हस्ते रविवारी भुमिपुजन करण्यात आले. त्यावेळी उपस्थित भाविकांशी संवाद साधताना देवस्थानचा नियोजनबद्ध विकास करून नगर पुणे महामार्गावरील हे देवस्थान भाविकांबरोबरच पर्यटकांचेही आकर्षण केंद्र ठरेल यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे सांगितले. राज्यभरातील भाविक वर्षभर हजेरी लावत असल्यामुळे येथे नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे तालुक्यासह बाहेरगावावरून आलेल्या प्रत्येक भाविकास सुखसुविधा उपलब्ध करून देणे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी देवस्थान समितीने विकास कामांचा आराखडा तयार केल्यास नियोजनबद्ध विकास करणे अधिक सोईचे होईल. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या देवस्थानाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यास मोठी संधी आहे. महामार्गावर असल्यामुळे त्यास प्रतिसादही चांगला मिळेल. त्यामुळे लवकरच या देवस्थानास पर्यटनस्थळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी आपण पर्यटन मंत्री आदीत्य ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत.
जातेगावच्या देवस्थानाबरोबरच मतदारसंघातील विविध देवस्थानांचाही विकास आराखडा तयार करण्याचे नियोजन आहे. विकास आराखडा तयार झाल्यावर वर्षभरात शासनाच्या विविध योजनांमधून वेगवेगळया देवस्थानांसाठी आवष्यक त्या प्राधान्य क्रमानुसार निधी मिळविता येईल. एैनवेळी मागणी केल्यानंतर लगेच निधी उपलब्ध होईलच याची शक्यता नसल्याने विकास आराखडयांच्या माध्यमातून संपूर्ण देवस्थानांच्या विकास कामांचे नियोजन करण्यात येणार आहे. देवस्थान समितीने मंदीर परिसरात केलेल्या विविध विकासकामांविषयी आमदार लंके यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अर्जुन बढे, उपाध्यक्ष विजय ज-हाड, सचिव प्रभू गायकवाड, विश्वस्त तात्यासाहेब देशमुख, राजेंद्र शेळके, संजय गायकवाड, दादा शिंदे, अॅड. राहुल झावरे, वाळवणे येथील भैरवनाथ देवस्थानचे अध्यक्ष सचिन पठारे, सामाजिक कार्यकर्ते विशाल फटांगडे, कारभारी पोटघन, माजी सरपंच सुभाष ढोरमले, विठठल पोटघन आदी यावेळी उपस्थित होते.
जातेगाव, ता. पारनेर ः गावठाणापासून भैरवनाथ देवस्थानाला जोडणा-या रस्त्याचे आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आले.