नगर : पारनेर अपडेट मिडिया
मुळा एज्युकेशन संस्थेचा कर्मचारी प्रतिक बाळासाहेब काळे या तरूणाने नगरमधील औरंगाबाद रस्त्यावर फाशी घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूवी प्रतिक याने व्हायरल केलेल्या व्हिडीओमध्ये शिवसेनेचे मंत्री शंकराव गडाख तसेच त्यांचे बंधू विजय गडाख यांचे नाव असून त्याची चौकशी करावी अशी मागणी भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगरमध्ये करण्यात आलेल्या आंदोलनात माजी आ. मुरकुटे हे देखील सहभागी झाले होते. मंत्री गडाख हे वंचितचे नेते संजय सुखदान यांच्यावर अन्याय करीत असल्याचा यावेळी आरोप करण्यात आला. यावेळी बोलताना मुरकुटे म्हणाले, या आत्महत्येचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव आहे. प्रतिक काळे याने व्हायरल केलेल्या व्हिडीओमध्ये मंत्री गडाख, त्यांची पत्नी तसेच भाऊ विजय यांचीही नावे घेण्यात आली आहे. संस्थेतील वरीष्ठ तसेच काही कर्मचाऱ्यांचीही नावे आहेत. गडाख कुटूंबातील एका महिलेने वर्षभरापूर्वी आत्महत्या केली होती. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंत्री गडाख यांचा राजिनामा घ्यावा अशी मागणीही मुरकुटे यांनी केली.
दरम्यान, याप्रकरणी सात जाणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी चार जणांना अटकही करण्यात आली आहे.