पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
गटेवाडी, घाणेगांव सेवा संस्थेच्या आज (शनिवारी) सायंकाळी जाहिर झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणूकीच्या निकालात सत्ताधारी शिवसेना, भाजपाच्या पॅनलचा धुव्वा उडवित राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन पॅनलने दणदणीत विजय संपादन केला आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत परिवर्तन पॅनलने १२ पैकी ११ जागा जिंकून सेवा संस्थेची सत्ता हस्तगत केली आहे. तर गेल्या दहा वर्षापासूनच्या शिवसेना,भाजपाच्या सत्तेला मात्र सुरूंग लागला आहे.
भाजपाचे नेते जि. प. माजी उपाध्यक्ष सुजित पाटील यांचे खंदे समर्थक अनिल वाबळे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणूकीत जनसेवा पॅनलने तिसऱ्यांदा मतदारांकडे कौल मागितला होता. तर आमदार नीलेश लंके समर्थक चंद्रकांत गट यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलने त्यांच्यापुढे आव्हान उभे केले होते. सत्ताधारी असल्यामुळे जनसेवा पॅनलची पारडे जड असतानाही मतदारांनी मात्र जनसेवाला साफ नाकारून राष्ट्रवादी पुरस्कृत परिवर्तन पॅनलला संधी दिली.
निवडणूक जाहिर झाल्यानंतर दोन्ही गटांकडून मतदारांच्या गाठी भेटी घेण्यात येत होत्या. परिवर्तनच्या उमेदवारांनी आ. लंके यांच्या पत्नी जि. प. सदस्या राणी लंके यांना प्रचारासाठी पाचारण करून मतदारांना साद घातली होती. सत्ताधारी जनसेवा मंडळाच्या नेतृत्वानेही डावपेच लढवित सत्ता टिकविण्यासाठी आहोरात्र परिश्रम घेतले, मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नसल्याचे निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले.
या निवडणूकीत परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे :
अमोल गट, राजाराम डावखर, संजय पवार, ललीता गट, कुसूम साळुंके, मिराबाई वाबळे, कचरू शिंदे, दामोदर परांडे, राजेंद्र वाबळे, गणेश परांडे, नवनाथ वाबळे.
तर सत्ताधारी जनसेवा पॅनलचे तुकाराम वाबळे हे एकमेव उमेदवार विजयी झाले. जनसेवाचे नेतृत्व करणारे अनिल वाबळे यांनाही या निवडणूकीत पराभव पत्करावा लागला.
निवडणूकीचा निकाल जाहिर झाल्यानंतर परिवर्तन पॅनलच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण तसेच फटाक्यांची आताषबाजी करीत एकच जल्लोष केला. विजयी उमेदवारांचे आमदार नीलेश लंके, जि. प. सदस्या राणी लंके, राष्ट्रवादीचे अध्यक्ष बाबाजी तरटे, युवा नेते सतिश भालेकर, अॅड. राहूल झावरे यांनी अभिनंदन केले.