राळेगणसिद्धी : पारनेर अपडेट मिडिया
महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम भगतसिंह कोश्यारी यांनी दोन दिवसांपूर्वी राळेगणसिद्धी या आदर्श गावाला भेट दिली. तसेच ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांचीही भेट घेतली. यावेळी राळेगणसिद्धीच्या ग्रामस्थांनी राज्यपालांकडे गावासाठी काहीच मागितले नाही. तर त्यांना एक वेगळीच मागणी करणारे निवेदन देण्यात आले.
ग्रामस्थांनी राळेगणसिद्धी गावचा कायापालट कसा झाला? याविषयी संक्षिप्त माहिती असणारे एक निवेदन राज्यपाल महोदयांना दिले असून त्याद्वारे राळेगणसिद्धी गावात लोक सहभागातून राबविलेल्या विविध योजनांची माहिती आहे. राळेगणसिद्धी येथे झालेले काम केवळ लोकांनी येऊन पहावे यासाठी नाही तर या कामाचा गुणाकार व्हावा अशी इच्छा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. राळेगणसिद्धीच्या कामाची प्रेरणा घेऊन अनेक खेड्यांमध्ये काम सुरू झालेले आहे. यापुढेही अनेक गावे राळेगणसिद्धीच्या धर्तीवर उभी रहावीत अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.
महात्मा गांधीजींनी सांगीतले होते की, जोपर्यंत गावे बदलणार नाहीत तोपर्यंत हा देश बदलणार नही. गावाचा जेव्हा सर्वांगीण विकास होईल तेव्हाच देशाचा सर्वांगीण विकास होईल.त्या दृष्टीने राळेगणसिद्धीचे काम प्रेरणादायक आहे. त्याचप्रमाणे नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य उपयोग करून घेऊन केलेला विकास हा खरा शाश्वत विकास असतो.निसर्गाचे शोषण करून केलेला विकास हा कधी ना कधी विनाशाला कारणीभूत होईल. दरवर्षी हजारो
टन माती पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जात आहे. त्यामुळे सुपिक जमिनीचे नुकसान होत असून धरणे गाळाने भरत आहेत. राळेगणसिद्धीने पावसाचा प्रत्येक थेंब आणि टॉप सॉईल दोन्हीही अवडले. त्यामुळेच जमिनीतील पाण्याची पातळी वाढली आणि धूपही थांबली. त्यामुळे गावातील लोकांच्या हाताला काम आणि पोटाला पोटभर भाकरी मिळू लागली, असे ग्रामस्थांनी लिहिले आहे.
५० वर्षांपूर्वी राळेगणसिद्धी गावातील ५० टक्के लोक उपाशी पोटी झोपत होते. विकास प्रक्रियेनंतर आज गावाची गरज भागवून गावातून २५० ते ३०० ट्रक फळे-भाजीपाला बाहेर जातो. पूर्वी अवघे ३०० ते ४०० लीटर दूधाचे संकलन होत होते. आज ते प्रतिदिन नऊ ते हजार ते साडेनऊ हजार लीटर दूध गावाबाहेर जात आहे. त्या माध्यमातून लाखो रुपये गावात येणे सुरू झाले आहे.
गांधीजी म्हणत होते की, तुम्हाला देशाची अर्थव्यवस्था बदलायची असेल तर अगोदर गावाची अर्थव्यवस्था बदलली पाहिजे. याचे उदाहरण राळेगणसिद्धीच्या ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे. गावाची अर्थनिती बदलली तर पैसा पहायला मिळतो आणि नैतिकता ढासळू लागते. राळेगणसिद्धी परिसरात ३५ दारुच्या भट्टा होत्या. आपली उपजिविका चालविण्यासाठी ते असा व्यवसाय करीत असत. पण प्रयत्नाने परिवर्तन झाले. आज ३२ वर्षे होऊन गेली, गावात बिडी, सिगारेट, तंबाखू विक्रीलाही नाही. कोटी रुपये किमतीची शाळेची इमारत गावकऱ्यांनी आपल्या हिमतीवर बांधली. कुणाचाही एक रुपयासुद्धा घेतला नाही. कारण विनोबांच्या उपदेशानुसार दान हे माणसाला नादान बनवते. म्हणून विकासाबरोबरच नैतिक मूल्यांची जपवणूक करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.
गांधीजी म्हणत असत की केवळ उंच उंच इमारती उभ्या करून विकास होणार नाही. तर ज्या माणसासाठी आपल्याला विकास करायचा तो माणूस बदलला पाहिजे. नुसत्याच उंच उंच इमारती उभ्या केल्या आणि माणसाची नैतिकता जर ढासळत गेली तर अशा विकासाला अर्थच राहणार नाही. राळेगणसिद्धीने हा विचार केला.
आज सगळीकडे जाती-पाती, धर्म-वंश असा द्वेष पसरलेला दिसून येत आहे. पण राळेगणसिद्धीच्या ग्रामस्थांनी याचा विचार खूप अगोदर केला. गावागावात द्वेश भावना, पक्षापक्षांत द्वेषभावना, व्यक्तीव्यक्तीत द्वेष भावना ही देशाला धोका आहे.
राळेगणसिद्धी परिवाराने ही द्वेष भावना नष्ट करून ४५ वर्षे द्वेष विरहित विकासकामे केली. हरिजनांसाठी वेगळी विहिर, मंदिरात प्रवेश बंदी, वेगळी स्मशानभूमी होती . या प्रथा बंद करून त्यांना भेदभाव न करता सोबत घेऊन गावकऱ्यांनी काम केले. गाव एक परिवार समजून हरिजनांच्या शेतीवर असलेले ६० हजार रुपयांचे कर्ज गावकऱ्यांनी श्रमदान करून फेडले. हरिजनांसहित सर्व जातीधर्माचे विवाह ९८३ पासून सामूहिक कर्याक्रमात एकत्रित होतात.
सुरुवातीची ३० वर्षे गावात निवडणूक झाली नाही. निवडणूक घेण्याऐवजी ग्रामसभेत सर्वानुमते सदस्यांची निवड करण्याची प्रथा राळेगणसिद्धी परिवाराने सुरू केली. कारण इलेक्शन ऐवजी सिलेक्शनला महत्त्व दिले तरच लोकशाही मजबूत होईल यावर राळेगणसिद्धीचा विश्वास आहे.
राळेगणसिद्धीच्या ग्रामस्थांची एकच इच्छा आहे की, राळेगणसिद्धीसारखी आणखी गावे उभी राहिली पाहिजेत. पण त्यासाठी लिडरशीप महत्त्वाची आहे. त्या लीडरशीपमध्ये शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन, जीवनात थोडा त्याग आणि अपमान पचवण्याची शक्ती असे गुण असणे आवश्यक आहे. ती लीडरशीप सत्याच्या मार्गावरून चालणारी पाहिजे. कारण सत्याच्या मार्गावरून जाताना त्रास होतो, पण सत्य कधीच पराभूत होत नाही.
आमचा देश हा तरुणांचा देश आहे. युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. तरुणांनी ठरवले तर हा देश बदलायला वेळ लागणार नाही यावर राळेगणसिद्धीच्या ग्रामस्थांचा विश्वास आहे. राळेगणसिद्धीचे परिवर्तन तरुणांनीच केले. पण त्यासाठी पहाटे उठून झाडू हातात घेण्याची तयारी असावी लागते. आमच्या राज्यात सर्व प्रकारचे प्रशिक्षण आहे. पण लीडरशीपचे प्रशिक्षण नाही. पण आदर्श नेतृत्वाशिवाय राळेगणसिद्धीसारखी गावे उभी होणार नाहीत असेही ग्रामस्थांनी राज्यपाल महोदयांना लिहिले आहे.
वरील सर्व मुदद्यांच्या आधारे एका राज्यात प्रयोग म्हणून जर ग्रामविकासाच्या योजना राबविल्या तर देशासमोर एक उदाहरण होऊ शकते. ग्रामविकास आणि विकासाला लागलेली भ्रष्टाचाराची गळती थांबवणे, ही दोन्ही कामे अत्यंत महत्त्वाची आहेत. म्हणूनच राळेगणसिद्धी परिवाराने भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन उभे केले. गेल्या १६ वर्षात गावाला भेट देण्यासाठी १४ लाख लोक येऊन गेले. चार लोकांनी पीएचडी केली आहे तर दोन करीत आहेत. यापूर्वी महामहिम के. एच. लतिफ, सी. सुब्रमण्यम आणि के. आर. शंकरनारायणन् अशा तीन राज्यपालांनी राळेगणसिद्धीच्या कामाला भेट दिलेली आहे. भगतसिंह कोश्यारी हे चौथे राज्यपाल ठरलेले आहेत. अशा लोकांच्या भेटीमुळे राळेगणसिद्धी परिवाराला अधिक काम करण्याची शक्ती मिळत गेली आहे.
पण केवळ लोकांनी गाव पहायला यावे ही राळेगणसिद्धी परिवाराची अपेक्षा नाही. तर या कामाचा गुणाकार व्हावा अशी अपेक्षा आहे. अशा अर्थाचे निवेदन राळेगणसिद्धीच्या ग्रामस्थांनी राज्यपाल महोदयांना दिले आहे. त्यावर मी लवकरच उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना राळेगणसिद्धीचे काम पहायला घेऊन येईन अशी प्रतिक्रिया राज्यपालांनी दिली.