पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
खरीप हंगामातील मूग,उडीद, सोयाबीनचे भाव घसरल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने नाफेड मार्फत हमीभावाने खरेदी करावी.त्यासाठी तालुका पातळीवर हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावीत अशी मागणी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक व पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी जिल्हा पणन अधिकारी एच.एल.पवार यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,नगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये मूग,उडीद, सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले आहे.त्यामुळे मूग,उडीद,सोयाबीनच्या खरेदीदरात मोठी घट झाली आहे.दिवसेंदिवस दर कमी होत आहेत.त्यामुळे उत्पादन खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने हमी भाव केंद्र सुरू करणे आवश्यक आहे.
पारनेर बाजार समितीच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून हमी भाव केंद्र चालवण्यात येत आहे.सदर केंद्राच्या माध्यमातून पूर्णपणे वाळवलेल्या,
स्वच्छ केलेल्या,शासनाने घालून दिलेल्या निकषानुसार (एफएक्यू दर्जाच्या) शेतीमालाची हमी भावाने खरेदी करण्यात येते व खरेदी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात येते.या पारदर्शक पद्धतीमुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळतो.ही बाब प्रशांत गायकवाड यांनी निवेदनाद्वारे पणन अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
आ. लंके यांच्यामार्फत पाठपुरावा
पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी आमदार निलेश लंके यांच्या मार्फत शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत.या प्रयत्नांना लवकरच यश येऊन हमीभाव खरेदी केंद्र सुरू होईल.हमीभाव खरेदी केंद्रात शेतीमाल विकण्यासाठी संबंधित पिकाची नोंद उताराऱ्यावर असणे आवश्यक आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी नोंदणी नियमितपणे करावी.
प्रशांत गायकवाड,सभापती बाजार समिती, पारनेर.