पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
गेल्या चौदा पंधरा वर्षांपासून पारनेर तालुक्याच्या विविध भागांमध्ये बिबट्याचे कधीतरी दर्शन होत असे. आता बिबट्यांची संख्या कमालीची वाढल्याचे चित्र असून माणसाळलेल्या बिबट्यांचा रात्री नव्हे तर दिवसाढवळया मुक्त संचार वाढल्याचे विविध घटनांवरून स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील रेणवडी येथे नुकताच त्याचा प्रत्यय आला असून ट्रॅक्टर घेऊन निघालेल्या शेतकऱ्याच्या दिशने बिबट्या धावल्याचे व त्यानंतर तो उसाच्या शेतामध्ये पसार झाल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसते आहे.
पहा व्हिडिओ
लगतच्या जुन्नर तालुक्यातील जंगलांमधून बिबट्यांचा पारनेर तालुक्यातील डाेंंगरदऱ्यांमध्ये आश्रयासाठी तसेच भक्ष्याच्या शोधासाठी गेल्या काही वर्षांत मोठया प्रमाणात वावर वाढल्याचे दिसून येते. विशेषतः बागायत भागांतील उसाच्या शेतांमध्ये बिबटे आश्रय घेत असून तेथेच मादी बिबट्यांनी पिलांना जन्म दिल्याच्याही अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. सुरूवातीस हाताच्या बोटांवर मोजता येणाऱ्या बिबटयांची संख्या कमालीची वाढली असून त्यांचा मानवी वस्त्यांमध्ये मुक्त संचार वाढला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी भक्ष्याच्या शोधासाठी बाहेर पडणारे बिबटे गेल्या काही दिवसांत दिवसाढवळया विविध शेतांमध्ये मुक्त संचार करीत असल्याच्या घटना घडत असून त्यामुळे तालुक्याच्या ग्रामिण भागात भितीचे वातावरण आहे.
विजेच्या लपंडावामुळे आगोदरच शेतकरी हैराण आहेत. शेतामधील पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी विशेषतः रात्रीच शेतामध्ये असतात. अशाचत बिबट्यांच्या संचारामुळे शेतकऱ्यांना जिव मुठीत धरून हे काम करावे लागत आहे. बिबट्यांच्या माणसांवरील हल्ल्याच्या फारशा घटना घडलेल्या नसल्या तरी त्यांच्या अस्तीत्वामुळेच नागरीकांची घबराट होते आहे. पाळीव प्राण्यांमध्येही बिबटयांची दहशत आहेत.
तालुक्यातील रेणवडी येथे कौठ मळयात शेतकरी संतोष गोरख भोर हे शेतामध्ये ट्रॅक्टर घेऊन निघाले असता शेजारच्या शेतामधून बिबट्या ट्रॅक्टरच्या दिशने धावून आला. ट्रॅक्टरचा मोठा आवाज ऐकूण बिबट्या मागे फिरला व उसाच्या फडामध्ये पसार झाला. दिवसाढवळया घडलेल्या या प्रसंगाचा व्हिडीओ काढण्यात आला असून तो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.