निघोज : पारनेर अपडेट मिडिया
शिरूर जि. पुणे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीचा मुख्य सुत्रधार पारनेर तालुक्यातील निघोज येथील असल्याची माहीती पुढे आली आहे ! याप्रकरणी मुख्य सुत्रधारासह त्याच्या निघोज येथील एका साथीदाराला सुमारे दोन कोटी रूपयांच्या मुद्देमालासह पुणे पोलिसांनी निघोज येथून ताब्यात घेतल्याची खात्रीशिर माहीती आहे. दरम्यान त्यांचे दोन साथीदार कावळा पिंपरी ता. जुन्नर येथून तर दोघ नगर येथून ताब्यात घेतल्याचीही माहीती आहे. गुन्हयाची उकल झाल्याच्या घटनेस पोलिस प्रशासनाने दुजोरा दिला आहे, मात्र अद्याप अधिकृत तपशील हाती आलेला नाही.
मननगर पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथील पारनेर ग्रामिण पतसंस्थेची शाखा गोळीबार करून लुटण्यात आली होती.त्यापाठोपाठ दि. २१ ऑक्टोबर रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास पिंपरखेड (ता. शिरूर) येथील बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा पिस्तुलाचा धाक दाखवून लुटण्यात आली होती. त्यात रोख रकमेसह सोन्याचे दागिणेही लुटून नेण्यात आले होते. या घटनेमुळे पुण्यासह नगर जिल्हयात खळबळ उडाली होती.
घटना घडल्यानंतर दरोडेखोर पारनेर तालुक्यात आल्याचे व तेथून पुढे गेल्याची माहीती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या भागात तपासणी केली. टाकळीढोकेश्वर, ता. पारनेर, वनकुटे, ता. पारनेर येथून त्यांचे वाहन गेल्याचे सीसी टिव्ही फुटेज पोलिसांना उपलब्ध झाले होते. मिळालेल्या माहीतीनुसार पोलिसांनी निघोज येथून या टोळीचा म्होरक्या ताब्यात घेतला असून त्याच्याकडून रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिणे असा सुमारे दोन कोटी रूपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात आल्याची माहीती आहे. या दरोडेखोराने निघोज कुंड येथील उसाच्या शेतामध्ये हा मुद्देमाल दडवून ठेवला होता. त्याने तो तेथून काढून दिल्याचे सांगण्यात येते. त्याचा जोडीदारही निघोज येथून ताब्यात घेण्यात आला आहे. त्याचे इतर साथीदार कावळा पिंपरी येथून दोन, तर नगर येथून दोघे ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे. प्रेस लिहिलेली सियाझ कार या गुन्हयामध्ये वापरण्यात आली होती.