पारनेर: पारनेर अपडेट मीडिया
तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.रस्त्यांची दुरूस्ती त्वरीत करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे शहराध्यक्ष वसिम राजे यांनी दिला आहे.
यासंदर्भात उप अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत.परिणामी अपघातांची संख्या वाढली आहे.अपघातामुळे काहींना प्राण गमवावे लागले आहेत तर अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे.
रस्त्यांच्या देखभाल दुरूस्तीच्या नावाखाली खड्डे मातीने बुजवण्यात आले.त्यामुळे पावसाळ्यात तालुक्यातील बहुतांश रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य होते.त्यामुळे वाहने विशेषतः दुचाक्या घसरून अपघात झाले आहेत.देखभाल दुरूस्तीच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा संशय निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करावी.रस्त्यांच्या दुरावस्थेस जबाबदार असणाऱ्या संबंधित ठेकेदार व शाखा अभियंत्यांवर कारवाई.रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.मागण्यांची दखल घेतली गेली नाही तर १ नोव्हेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उप अभियंत्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा येईल असा इशारा वसिम राजे यांनी दिला आहे.
यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मारुती
रोहोकले,भाऊसाहेब खेडेकर,तालुका उपाध्यक्ष सतिष म्हस्के,महेंद्र गाडगे,सनी थोरात,फजल मोमीन,साहील शेख उपस्थित होते.
दुरुस्तीचा देखावा नको !
रस्त्यांची दुरुस्ती करताना रस्त्यावर पडलेले सर्व खड्डे बुजवण्यात येत नाहीत.प्रमुख गावाजवळील खड्डे बुजवून दुरूस्तीचा देखावा करण्यात येतो. नियमित देखभाल,दुरूस्ती झाली असती तर रस्त्यांची दुरवस्था झाली नसती.डांबरी रस्ते मातीने बुजवणे स्थापत्य अभियांत्रिकीच्या कोणत्या उपाययोजनेत बसते?
वसिम राजे,
पारनेर शहराध्यक्ष,मनसे.
नजीकच्या काळात सर्व रस्ते दुरुस्त होतील
पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.दुरूस्तीचे काम सुरू आहे.मातीने बुजवलेल्या खड्डे पुन्हा खोदून दुरूस्ती करण्यात येईल.तालुक्यातील विविध रस्त्यांची कामे सुरू आहेत.बहुतांश रस्ते नजिकच्या काळात व्यवस्थीत होतील.
प्रकाश तिपोळे,उपअभियंता,सा.बा.
उपविभाग, पारनेर