भाळवणी : पारनेर अपडेट मिडिया
पुढील वर्ष निवडणूकांचे आहे. माझे हात बळकट करण्यासाठी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती तसेच पारनेर नगर पंचायतीच्या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मीच उमेदवार आहे असे समजून भरघोस मतदान करण्याचे आवाहन आमदार नीलेश लंके यांनी केले.
आपल्या मतदासंघात फक्त आणि फक्त घडयाळाचा गजर होणार असल्याचा दावा करतानाच कुठल्याही परिस्थितीत सर्व सत्ता ताब्यात घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही अशी प्रतिज्ञाही त्यांनी केली.
जामगांव ते सारोळा आडवाई रस्ता सुधारणा करणे (१ कोटी ८२ लाख १५ हजार रूपये), जामगांव माथा साठे वस्ती ते लोणीहवेली रस्ता सुधारणा करणे (१ कोटी ८६ लाख ६६ हजार), धोत्रे नगर कल्याण महामार्ग ते धोत्रे रस्ता सुधारणा करणे (२ कोटी ३६ लाख २८ हजार), भाळवणी राज्य मार्ग ते हनुमानवाडी रस्ता सुधारणा करणे (१ कोटी ५८ लाख २७ हजार), भाळवणे ते दैठणेगुंजाळ रस्ता सुधारणा करणे (५०लाख), कोल्हापूरी बंधारा, जामगांव हाडोळेवस्ती (३७ लाख ६५ हजार, कोल्हापूरी बंधारा जामगांव मेहेरवस्ती (४८ लाख ६९ हजार) या कामांचे भुमिपुजन तसेच लोकार्पण आ. लंके यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले, त्यावेळी ते भाळवणी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. विधानसभा निवडणूकीच्या निकालास दोन वर्षे पुर्ण झाल्याबददल यावेळी आ. लंके यांची लाडू तुला करण्यात आली. पंचायत समितीचे माजी सदस्य गंगाराम रोहकले हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सुरेश धुरपते, प्रशांत गायकवाड, सुनंदा धुरपते, अशोक सावंत, अॅड. राहूल झावरे, दादा शिंदे, संभाजी रोहोकले, जितेश सरडे, किशोर यादव, विजय औटी, प्रा. संतोष भुजबळ, रियाज पठाण, बबलू रोहोकले, विक्रमसिंह कळमकर, अभयसिंह नांगरे, राजेश चेडे, कारभारी पोटघन, सत्यम निमसे यांच्यासह परिसरातील नागरीक यावेळी उपस्थित होते. बाबाजी तरटे यांनी प्रास्ताविक केले.
आ. लंके म्हणाले, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या रूपाने एक आदर्श अर्थमंत्री राज्याला लाभला असून आपल्या मतदारसंघाला झुकते माप देण्याची भुमिका नेेहमीच पवार यांनी घेतली आहे. करोना संकटामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण आहे, अशाही स्थितीमध्ये पवार यांनी मतदारसंघातील विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला नाही. अर्थसंकल्पातही तालुक्यातील कामांसाठी भरभरून निधी दिला. पाण्याच्या अनेक योजना पुर्णत्वास नेण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपमुख्यमंत्री अजितदादा हे आग्रही आहेत. आपल्या मतदासंघावर विशेष लक्ष असलेल्या या पक्षाची ताकद वाढविण्याची जबाबदारी आता आपली आहे. विधानसभा निवणूकीत तुम्ही मला भरभरून मते दिली. आता आगामी निवणूकीतही मी उमेदवार आहे हे समजून जि. प. पंचायत समिती, बाजार समिती तसेच नगर पंचायतीच्या निवडणूकीत मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. आपल्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्याच घडळयाचा गजर होणार असल्याचा दावा करतानाच कोणत्याही परिस्थितीत सर्व सत्ता ताब्यात घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही अशी प्रतिज्ञाही त्यांनी केली.
आ. लंके पुढे म्हणाले, आज भाळवणी येथे कार्यक्रम पार पडत आहे. भाळवणीकरांनी मला भरभरून दिले. त्यांच्या प्रेमातून उतराई होण्यासाठी त्यांनी केलेल्या मागण्यांचा विचार करून विकास कामांना निधी उपलब्ध करून दिला. उर्वरीत मागण्याही पुर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली. भाळवणीकरांनी काय कमी केले ? असा सवाल करीत करोना काळात शरदचंद्र पवार आरोग्य मंदीराच्या माध्यमातून भुजबळ परिवाराने मोठे योगदान दिले. ते विसरता येणार नाही. भाळवणी येथे आरोग्य मंदीर असल्यामुळे देशभर,जगभर भाळवणीचे नाव झाले. बाहेरचे लोक तर तुम्ही भाळवणीचे आमदार आहेत का असेही विचारून लागले आहेत. या आरोग्य मंदीरात ३० हजारांपेक्षाही जास्त करोना रूग्ण बरे होउन गेले. तेथे एकही रूग्ण दगावला नाही याचीही आठवण आ. लंके यांनी करून दिली.