चौकशी करून दोषी असणाऱ्यांवर कारवाई करा : शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांची मागणी
शिक्षण व महसूल यांचा समन्वय नसल्यामुळे  प्राथमिक शिक्षकांची होतेय कुचंबना 
 अहमदनगर : पारनेर अपडेट मिडिया
      राज्यात जवळपास सर्वच जिल्हा परिषदांमधील शिक्षकांचे लसीकरण दोन डोससह पूर्ण झालेले असताना नगर जिल्ह्यातील शिक्षक मात्र महसूल, आरोग्य व शिक्षण विभागाच्या वेगवेगळ्या आदेशाचे पालन करत लसीसाठी वणवण फिरत आहेत. शासनाचे कोणतेही  काम प्राथमिक शिक्षकांशिवाय पुर्ण होत नाही. परंतु त्यांच्या आरोग्याबाबत लक्ष्य  द्यायला मात्र कुणाला वेळ नाही. लसीकरणाअभावी मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकांची कोण जबाबदारी घेणार असा सवाल करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी केली आहे.

     काही पदाधिकारी शिक्षकांबद्दल सातत्याने समाजात जाणीवपूर्वक  नकारात्मक चर्चा घडवून आणतात. आता त्यांनी तरी आपत्तीकाळात असले उद्योग बंद करावेत. लसीकरणाबाबत आम्ही संघटना म्हणून सातत्याने मागणी करत आहोत. परंतू लसीकरणासाठी आदेश काढायला अधिकारी वर्गाला वेळ मिळत नाही. मात्र आमच्या जिवीताची कोणतीच काळजी न करता भराभर आदेश काढण्यास मात्र वेळ आहे.
     सर्व राज्यात लसीकरण झालेले असताना नगर जिल्हा अपवाद कसा राहीला?  याची चौकशी शासन पातळी वरुन होणे आवश्यक असून दोषी असणाऱ्यांवर कारवाई झाली पाहीजे. कारण या हलगर्जीपणामुळे जिल्ह्यातील ४२ शिक्षकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
      यासंदर्भात आम्ही १८ तारखेला आत्मक्लेश आणि अन्नत्याग आंदोलन करणार आहोत. आंदोलनाची नोटीस देऊन १० दिवस झाले मात्र आश्वासनांच्या पलीकडे आम्हाला काहीच मिळाले नाही.
     जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त सामाजिक कार्य प्राथमिक शिक्षकांनी केलेले आहे. त्याचप्रमाणे ते आपले कर्तव्य देखील पार पाडत आहेत. म्हणून आम्ही आजच मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री तसेच आपल्या जिल्ह्याचे भूमिपूत्र मा. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचेकडे प्राथमिक शिक्षकांचे लसिकरण करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्यांचा तपास करून त्यांच्यावर यथायोग्य कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करणार आहोत.
     आंदोलनाचा पहिला टप्पा आत्मक्लेषाचा असून प्रत्येक शिक्षक आपल्या कुटुंबासमवेत घरी थांबून सदर आंदोलन करणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक तहसिल कार्यालयापुढे उपोषण केले जाणार आहे. त्यातूनही न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन केले जाईल. जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी उद्या होणाऱ्या आत्मक्लेष आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांच्यासह शिक्षक परिषदेचे  तालुकाध्यक्ष संजय दळवी, सुनिल दुधाडे , भाऊसाहेब हासे, दिपक झावरे, राजेंद्र पालवे, बाबा तांबे,  संतोष खोमणे , सोमनाथ घुले, दशरथ ढोले, सुजित बनकर, राजेंद्र मोहोळकर, दत्तात्रय गायकवाड
यांनी केले आहे.
बेफिकीर शिक्षण विभाग ! 
 शिक्षण विभागाच्या गलथान कारभाराचा फटका जिल्ह्यातील १२ हजार शिक्षकांना बसलेला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांची माहिती घेतली असता, तात्कालीन परिस्थितीत ६ महिन्यांपूर्वीच त्या त्या जिल्हा परिषद शिक्षण विभागानी सर्व शिक्षकांची ऑनलाईन नाव नोंदणी केली होती. पण दुर्दैवाने आपल्या शिक्षण विभागाने फक्त अधिकारी व त्यांच्या आस्थापनेतील कर्मचाऱ्यांचीच नोंदणी केली. प्राथमिक शिक्षकांची नोंदणी त्याचवेळी केली असती तर आज हा प्रश्नच उद्भवला नसता. म्हणूण नाईलाजास्तव आंदोलनाची वेळ संघटनेवर आलेली आहे.
 प्रविण ठुबे 
जिल्हाध्यक्ष अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषद
                                
	                            
                                                            
	    	
