निघोज ग्रामपंचायत सदस्यांचे अपहरण प्रकरण
निघोज : पारनेर अपडेट मिडिया
निघोज येथील सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडीआधी सहलीवर गेलेल्या सदस्यांपैकी दोघांचे अपहरण केल्याप्रकरणी दाखल गुन्हयातील आरोपींना येत्या ९ ऑगस्टपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने दिलासा दिला आहे.
निघोज ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाच्या दि. ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडीआगोदर एका गटाचे सदस्य सहलीवर गेले होते. ते पुणे जिल्हयातील खेड शिवारात असताना सदस्य दिगंबर भागाजी लाळगे व गणेश कवाद यांचे २० ते २५ जणांच्या टोळक्याने शस्त्रांचा धाक दाखवून अपहरण करण्यात आले होते. दि. ९ रोजी पार पडलेल्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणूकीसाठी हे दोघे सदस्य उपस्थित राहू शकले नव्हते. विरोधी सचिन वराळ गटाच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप करीत सचिन वराळ यांच्यासह मंगेश वराळ, सुनिल वराळ, नीलेश घोडे, अजय वराळ, राहूल वराळ, धोंडीबा जाधव, स्वप्निल दुणगुले, सुभाष वराळ, अक्षय वराळ आदींविरोधात खेड पोलिस ठाण्यात विठठल कवाद यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटना घडली त्या दिवशी सचिन वराळ व मंगेश वराळ हे निघोजमध्येच होते. त्यामुळे या घटनेशी आपला सबंध नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तसेच निघोज येथील वास्तव्याचे पुरावे सादर केल्यानंतर न्यायालयाने सचिन वराळ व मंगेश वराळ यांचा अटकपूर्व जामीन मंजुर केला. उर्वरीत आरोपींना सत्र न्यायालयात दिलासा मिळू शकला नाही त्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. अटकपूर्व जामीनावर सुनावणी घेण्यापूर्वी न्यायालयाने आरोपींना दिलासा देत दि. ९ ऑगस्टपर्यत जामीन मंजुर केला. दि. ९ ऑगस्ट रोजी या प्रकरणी सुनावणी होणार आहे. न्यायमुर्ती सारंग कोतवाल यांच्यापुढे सुनावणी झाली. आरोपींच्या वतीने नितिन पाटील यांनी काम पाहिले.
तपासात सहकार्य करण्याचे निर्देश
तात्पुरता अटकपूर्व जमीन मंजूर करताना न्यायालयाने आरोपींना पोलीस तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले.