चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची रूणाल जरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
नगर : पारनेर अपडेट मिडिया
यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येमागे पत्रकार बाळ बोठेसह काही भ्रष्ट शासकिय अधिकाऱ्यांचाही हात असल्याचा संशय जरे यांचा मुलगा रूणाल जरे यांनी मुख्यमंत्रयांना पाठविलेल्या निवेदनात केला आहे. येत्या १५ दिवसांत चौकशी होऊन कारवाई न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा जरे यांनीं दिला आहे.
मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष असलेल्या रेखा जरे संघटनेच्या माध्यमातून समाजकार्य करीत होत्या. विविध शासकिय कार्यालयातील गैरकारभारांना आळा घालीत भ्रष्ट्राचाराविरोधात लढा देत होत्या. समाजकार्याच्या माध्यमातून जरे यांची कार्यकारी संपादक बाळ बोठे याच्याशी ओळख होऊन त्यांच्यात मैत्री झाली होती.जरे या शासकिय कार्यालयांमधील भ्रष्ट्राचाराविरोधात आवाज उठवित असल्याचे पाहून बोठे याने भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट्राचाराविरोधात जरे यांच्या लेटरपॅडवर निवेदने सादर केली होती. ही निवेदने देण्यात आल्यानंतर बोेठे त्यासंदर्भातील बातमी मोठी प्रसिद्ध करीत अधिका-यांना धमकावित असे. बोठे सबंधित अधिकाऱ्यांना रेखा जरे यांची भिती घालीत असे. त्यामुळे अधिकारी घाबरून बोठे याच्याशी आर्थिक तडजोड करीत असत. रेखा जरे यांच्या हत्येनंतरच्या चर्चेतून व चौकशीतून या गोष्टी उघड झाल्याचे रूणाल यांनी या निवेदनात नमुद केले आहे.
दि. ३० नोहेंबर रोजी मारेकऱ्यांकडून जातेगाव घाटात जरे यांची हत्या करण्यात आली. पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा सुक्ष्म तपास करण्यात येऊन सर्व आरोपींना जेरबंद करण्यात आले. बाळ बोठेकडून सुपारी घेउन हत्या केल्याचे आरोपींनी कबूल केले. त्यानुसार या आरोपींविरोधात दोषारोपत्रही दाखल झाले. घटनेनंतर फरार झालेल्या बाळ बोठेलाही पोलिसांनी अतिशय मेहनतीने जेरबंद केले. तपासादरम्यान बोठे याने जरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे कबूल करीत जरे या आपली बदनामी करतील या भितीने हत्या केल्याचेही त्याने सांगितले.
बोठे मोठया दैनिकात कार्यकारी संपादक होता. तो सतत वेगवेगळया कार्यालयांतील भ्रष्ट्राचार उघडकीस आणून त्यांना धमकाऊन खंडणी उकळत असे. रेखा जरे यांच्या हत्येसाठी १२ लाखांची सुपारी दिल्याचे त्याने कबुल केलेे आहे. परंतू सुपारीची रक्कम कोणी दिली ? का दिली ? याचा तपास अद्यापही बाकी आहे. ते दोषारोपपत्रामध्ये स्पष्टपणे दिसते आहे. या अनुषंगाने रूणाल जरे हे सतत चौकशी करीत माहीती घेत आहेत.
आईसोबत वेळोवेळी यासंदर्भात आपली चर्चाही होत असल्याचे नमुद करून या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, यासंदर्भातील काही कागदपत्रे आपल्या हाती लागली असून बाळ बोठे याने ज्या अधिकाऱ्यांविरोधात रेखा जरे यांच्या लेटरहेडवर निवेदने दिली. त्यासंदर्भातील मोठया बातम्या प्रसिद्ध केल्या व त्या अधिकाऱ्यांनी बोठे यास पैसे देऊन रेखा जरे यांना गप्प बसविण्यास सांगितले. मात्र जरे यांनी गप्प न बसता सदर प्रकरणांचा पाठपुरावा सुरूच ठेवला होता. त्याच अधिकाऱ्यांकडून पैसे घेउन बाळ बोठे याने आईच्या हत्येची सुपारी दिली असावी असा संशय रूणाल यांनी व्यक्त केला आहे.
रेखा जरे यांच्या हत्येनंतर जे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे त्यानुसार अनेक बाबी स्पष्ट होत आहेत. तपासादरम्यान बोठे याच्या घरात, कार्यालयात, रेखा जरे यांचे लेटरपॅड तसेच काही कागदपत्रे तपासात हस्तगत करण्यात आलेली आहेत. त्यावरील सहयांबाबत फॉरेन्सीक लॅबच्या अहवालानुसार कागदपत्रांवरील सहया रेखा जरे यांच्या नसून बनावट, खोटया असल्याचे स्पष्ट झाले आहे.या बाबी अलिकडच्या काळात रेखा जरे यांच्या लक्षात आल्या होत्या.जरे यांच्या खोटया सहया करून अनेक तक्रारी, निवेदने दडपण्यात येत आहेत. या प्रकरणात केवळ बोठे सहभागी नसून सदर तक्रारी किंवा निवेदने ज्या अधिकाऱ्यांविरोधात आहेत ते देखील त्यात सहभागी आहेत किंवा दोषी आहेत. बोठेचे काही सहकारी देखील यामध्ये सहभागी असून या पंटरमार्फत बोठेने अनेकांना ब्लॅकमेल केले आहे. बोठे याने तपासात सांगितले आहे की,रेखा जरे माझी बदनामी करतील ही भीती मला होती. या अनुषंगाने हे प्रकरण समजाऊन घेतले असता असे लक्षात आले की बोठे घातपात करेल असे रेखा जरे यांच्या आगोदरच लक्षात आले होते. त्यामुळेच रेखा जरे यांनी हत्येपूर्वी स्वहस्ताक्षरात एक पत्र लिहून ठेवले होते. त्या पत्रात जरे यांनी बोठे याचा सगळा बुरखा फाडला होता.
जरे यांनी लिहिलेल्या पत्रात बोठे कशा प्रकारे ब्लॅकमेल करतो ? राजकिय पाठबळ कसे मिळवितो ? स्त्रीयांचा कसा वापर करतो अशा अनेक बाबींचा उल्लेख आहे. बोठे व रेखा जरे यांच्यातील संभाषणही रेकॉर्डींग स्वरूपात असून त्यातही त्याने बोलता बोलता अनेक बाबींचा खुलासा केला आहे. त्यानुसार तो किती विकृत व्यक्ती आहे, हे स्पष्ट होते. बोठे सुरूवातीला क्राईम रिपोर्टर होता. त्यामुळे पोलिस दलाची कामाची पद्धतही त्यास चांगलीच अवगत होती. पोलिस दलातही त्याने अनेकांशी मैत्री ठेवली होती.या सर्व बाबींचा गैरफायदा घेउन बोठेने मोठया प्रमाणात अवैध मालमत्ता गोळा केलेली आहे. सरासरी ५० ते ६० हजार पगार असणारा बोठे अवघ्या १५ ते २० वर्षात गडगंज संपत्तीचा मालक होतो. याच अवैध संपत्तीचा तो गैरवापर करून गैरकृत्य करतो. तो ज्या पदावर कार्यरत होता, त्या पदाचा गैरवापर करून त्याने मोठया प्रमाणावर अवैध मालमत्ता जमविली असून अनेक अधिकारी या निमित्ताने उघडे पडू शकतात. रेखा जरे यांची हत्या ज्या बदनामीच्या भितीने झाली, ती बदनामी नेमकी काय हे देखील चौकशीतून पुढे येईल.
चौकशी करण्यासाठी बोठे याचे मागील पाच वर्षातील मोबाईल कॉल डिटेल्स, मोबाईल लोकेशन्स, फेसबुक, व्हॉटस् अॅप मधील चॅटींग, मेसेजेस, व्हिडीओ या बरोबरच या कालावधीमधील ज्या ज्या अधिकाऱ्यांविरोधातील निवेदने, तक्रारी, सबंधित दैनिकात मोठया मथळयाखाली प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या त्यांचेही कॉल डिटेल्स तसेच बोठे याच्या जवळचे नातलग, मित्र यांची कसून चौकशी करून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करावेत. १५ दिवसांत चौकशी करून कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवसस्थानासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा जरे यांनी दिला आहे.